दुभंगता पाकिस्तान 

    02-Nov-2016
Total Views |

फाळणीनंतर विलग झालेल्या भारत आणि पाकिस्तान या दोन्ही स्वतंत्र देशांना अंतर्गत जातीय, प्रादेशिकवादाची झळ कमी-जास्त प्रमाणात सहन करावी लागली. 

भारतातही खलिस्तान, तमिळ एलमच्या चळवळींनी ७०-८०च्या दशकात डोके वर काढले, पण भारतीयत्वाची भावना आणि मुत्सद्दी धोरणांमुळे भारताचे तुकडे पडले नाहीत. याउलट १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानचा बांगलादेश झाला आणि त्यानंतर पाकिस्तानातील इतरही गटातटांची पूर्वीपासूनच पंजाबी मुसलमानांच्या हुकूमशाहीतून स्वतंत्र होण्याची चळवळ वेग धरु लागली. यामध्ये प्रामुख्याने बलुची, सिंधी, पश्तूनी यांचा समावेश होतो. तेव्हा पाक सरकारच्या अमानुष राजवटीतून स्वातंत्र्याचा मार्ग चोखाळणार्‍या अशाच काही ऐतिहासिक चळवळींचा आढावा घेणारा हा लेख.

फाळणीपूर्व काळामध्ये समस्त हिंदू जितक्या समरसतेने एकमेकांत ऐक्य ठेवून ब्रिटिशांशी लढत होते तेवढे ऐक्य मुस्लिमांच्या विविध गटांमध्ये नसल्यामुळेच बॅ. जिना यांच्यामागे समस्त मुस्लीम समाज एकसंधपणे उभा नव्हता. पाकिस्तान निर्मितीच्या वेळी पंजाब, बंगाल आणि सिंधमधील मुस्लीम जिनांच्या मागे होते; परंतु बलुचिस्तान वा आज नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स (NWFP) आणि फेडरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायबल एरिया (FT) येथील मुसलमान मात्र पाकिस्तानमध्ये विलीन होण्यास बिलकुल तयार नव्हते. पाकिस्तानी सैन्याने १९४८ नंतर लष्करी कारवाई करून हे भूभाग आपल्या ताब्यात घेतले. यानंतरचा इतिहास आपल्याला चांगलाच माहिती आहे, कारण आपण तो जगलो आहोत. पाकिस्तानची सूत्रे उत्तरोत्तर त्याच्या सैन्याच्या हाती एकवटली, त्याच क्रमाने सैन्यामध्ये वरचढ असलेले पंजाबी मुसलमान देशाची सत्ता आपल्या हाती ठेवण्यामध्ये यशस्वी झाले. स्वभावतः मग्रूर, अरेरावी, अहंकारी, गर्विष्ठ अशा या जमातीने आपल्या वागणुकीमधून सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्यासोबत आलेल्या बंगाली आणि सिंधी-मुसलमानांना दूर लोटले, त्यांच्यावर अनन्वित अत्याचार केले. ’बळी तो कान पिळी’ हा एकच न्याय पंजाबी मुसलमानांना समजत असावा. त्यांच्या त्या वृत्तीमधूनच पुढे १९७१ मध्ये बंगाली मुसलमानांना पाकिस्तान सोडून बांगलादेश स्थापन करण्याची मागणी करावी लागली आणि भारताच्या मदतीने त्यांचे स्वप्न वास्तवात उतरले. बांगलादेश निर्मितीच्या लढ्यामध्ये तिथे राहत असलेले केवळ हिंदूच नव्हे, तर मुसलमानसुद्धा कसे भरडले गेले, त्यांचे कसे शिरकाण झाले, याच्या रक्तरंजित कहाण्या पाने भरूनच्या भरून वाचायला मिळतात. ओकारी काढावीशी वाटेल असा रक्तरंजित इतिहास आणि इस्लाम यांची फारकत कधी झाली नसावी, ती याही इतिहासामध्ये झालेली नाही. त्यामुळे जो घटक इस्लामच्या लढ्यामध्ये अविभाज्य असतो, त्या घटकाबद्दल लिहिण्याचे प्रयोजन मला राहत नाही. त्यापेक्षा यातील राजकीय घटकांविषयी जाणून घेणे आपल्याला अधिक उपयुक्त वाटेल.

मुहाजिरांची होरपळ

१९४७च्या ऑगस्टच्या आसपास भारताच्या सर्व भागातून खासकरून उत्तर प्रदेश, बिहार आणि भारतीय ताब्यातील पंजाबमधून मोठ्या प्रमाणावर शिया तसेच सुन्नी मुसलमान कुटुंबे पाकिस्तानमध्ये स्थलांतरित झाली. उत्तर प्रदेश व बिहारमधून तिथे गेलेले मुसलमान हे बरेलवी पंथाचे होते. भारतामधल्या देवबंदी आणि बरेलवी या पंथांमधले बरेलवी हे देवबंदींपेक्षा सौम्य मानले जातात. येथून गेलेले बरेलवी हे सुशिक्षित होते. इंग्रजांच्या अंमलामध्ये त्यांनी केंद्रीय आणि प्रांत सरकारमध्ये काम केले होते. याखेरीज लहानसहान कारखान्यांमध्ये काम करणारे व अन्य हलकीसलकी कामे करणारे मुसलमानही तिथे गेले होते. ही मंडळी कराची या मुख्य शहरात, तसेच सिंधमध्ये स्थायिक झाली. ते स्वतःला आजही ‘मुहाजिर’ म्हणजे स्थलांतरित किंवा निर्वासित म्हणवून घेतात. ते उर्दू बोलतात, पण मूळच्या पाकिस्तानी मुसलमानांमध्ये मिसळत नाहीत. आपली वेगळी ओळख ठेवतात. त्यांच्या अमानुष संस्कृतीमध्ये सामावण्यापेक्षा आपली आहे तशी ओळख त्यांना प्रिय वाटते. पंजाब वा हरियाणामधून गेलेले मुसलमान बहुसंख्येने सुन्नी होते, त्यांच्यामध्ये शिया फार कमी होते. हे सुन्नी देवबंदी पंथाचे होते. देवबंदींंची विचारसरणी सौदी अरेबियाच्या जहालपंथी वहाबींंशी मिळतीजुळती आहे. पंजाबी वा हरियाणवी मुसलमान फारसे शिकलेले नव्हते. ते स्वतःला निर्वासित मानत नसत. ते झटकन पाकिस्तानी संस्कृतीमध्ये मिसळून गेले. शिक्षणाचा अभाव असलेल्या या गटामध्ये बहुसंख्येने लष्करी पेशातले लोक होते, तर काही शेतमजूर. पाकिस्तानामध्ये गेल्यानंतर हे शेतमजूर भूमिहीन मजूर म्हणून झांग, मुल्तान अशा पंजाबी प्रदेशामधील शिया जमीनदारांकडे काम करू लागले. जमीनदारांनी केलेल्या पिळवणुकीमुळे शियांच्या विरोधात सुन्नी शेतमजुरांमध्ये एक संतापाची लहर होती.


 

सरहद्द गांधी होता तरी...

दुसरीकडे बलुचींची वागणूक मात्र वेगळी होती. आपण पाकिस्तानी मुस्लिमांसोबत सुखशांतीचे जिणे जगूच शकत नाही, हे पहिल्यापासून माहिती असलेल्या बलुचींंनी त्या काळामध्ये पं. नेहरू तसेच गांधीजींना साकडे घालून आपल्याला पंजाबी मुसलमानांच्या तोंडी देऊ नका, भारतामध्ये सामील करून घ्या म्हणून प्रयत्न केले. पण या दोन्ही नेत्यांनी त्यांच्या तोंडाला पाने पुसली. हीच कथा NWFP मधले जनतेचे नेते खान बहादुर अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी हे सुद्धा सांगत असत. १९४८ मध्ये पाकिस्तानने लष्करी कारवाई करून हे भाग बळजबरीने पाकिस्तानमध्ये जोडून घेतले. तेव्हापासून त्यांची परवड सुरूच आहे. आज पाकिस्तानला त्यांची ४०% ऊर्जा आणि ३६% गॅस बलुचिस्तान पुरवतो. पण खुद्द बलुचिस्तानमधल्या ४६% लोकांना मात्र वीज मिळत नाही. अशा तर्‍हेने त्यांच्या मूलभूत गरजाही पुरवण्याची तसदी पंजाबी राजवटीने घेतलेली नाही.


संस्कृतीचा विचार करायचा तर संपूर्ण पाकिस्तानमध्ये कोणी जर तिथे राहणार्‍या हिंदूंची काळजी घेतली असेल आणि भारतामधील हिंदूंविषयी प्रेम दाखवले असेल, तर बलुचींंशिवाय दुसरे नाव ओठावर येणार नाही. असे करत असताना त्यांनी आपल्या सरकारचा रोष तर पत्करलाच, पण त्यासाठी त्यांचा छळ केला गेला तोही सहन केला. असे प्रेम अगदी सरहद्द गांधींंच्या प्रांतातही हिंदूंना मिळाले नाही. सरहद्द गांधींनी आपल्या प्रांतामधील हिंदूंना आपले संरक्षण कवच देऊनसुद्धा तिथल्या हिंदूंचे शिरकाण झाले. जे जीवंत राहिले त्यांना भारतामध्ये पळून यावे लागले. पण बलुचिस्तानमधून मात्र हिंदूंना फाळणीच्या वेळी पलायन करावे लागले नाही. त्यांच्यावर अन्याय झाला तो पुढच्या काळामध्ये, जेव्हा पाक लष्कराने ग्वादार बंदर बांधण्याच्या काळामध्ये भारतीय हस्तक असल्याचा संशय घेऊन त्यांना बळजबरीने बलुचिस्तानातून हुसकावून लावले. १९९२ मध्ये बाबरी मस्जिद पडली तेव्हा पाकिस्तानी पंजाबमध्ये राहणार्‍या हिंदूंना दंगलींना सामोरे जावे लागले. अशा घटना थोडक्या का होईना, सिंध आणि NWFP मध्ये देखील घडल्या. पण बलुचिस्तानमध्ये मात्र एकही घटना घडली नाही. बलुची जनता स्वभावतः सर्व समावेशक आहे आणि तशीच राहिली आहे. त्यांच्यामधले तरुण कधी दहशतवादी गटांमध्ये गेलेले दिसत नाहीत. तुरळक संदर्भ आढळतात ते संमिश्र विवाहाच्या अपत्यांचे. जिथे माता बलुची आणि पिता येमेनी आहे. अशा काही व्यक्ती दहशतवादी कृत्यांमध्ये भाग घेताना आढळल्या आहेत. पण विशुद्ध रक्ताच्या बलुची इसमाची जडणघडण मात्र वेगळी आहे. आजही या प्रांतात हिंदू आढळतात आणि त्याचे श्रेय बलुचींना जाते. 


तर अशा बलुचींवर (आणि बंगाली मुसलमानांवर) पहिले संकट ओढवले ते पाकिस्तानने ‘वन युनिट’ योजना जाहीर केली त्यामुळे. पंजाबी मुसलमान आपली सांस्कृतिक ओळख पुसून टाकायच्या मागे आहेत, हा त्यांचा संशय या योजनेमुळे बळावला. बलुचींनी संघर्ष छेडला. पाक सरकारने तिथे एक हजार सैनिक पाठवले. पण हे बंड थांबले नाही. ही योजना जेव्हा १९७० मध्ये बंद करण्यात आली, तेव्हाच बलुचींनी आपला संघर्ष संपवला. तोवर पूर्व पाकिस्तानात युद्धाचे ढग जमू लागले होते. १९७१च्या युद्धानंतर म्हणजे बांगलादेशच्या निर्मितीनंतर पाक सरकार बलुचींकडे अधिकच संशयाने बघू लागले. भुत्तोने त्यांच्यावर अगोदर असलेले निर्बंध कडक केले. अमेरिका आणि पाकिस्तानची तर खात्रीच पटली होती की, भारत आता बलुची स्वातंत्र्ययुद्धाला उघड पाठिंबा देऊन पाकिस्तानचा दुसरा लचका तोडणार. त्यातच भारताकडून कोणताही पाठिंबा नसतानाही बलुचींनी भारत आपल्याही मागे उभा राहील अशा आशेने पुन्हा उचल खाऊन नवे स्वातंत्र्ययुद्ध छेडले. हा लढा १९७१ पासून जवळजवळ १९७५ पर्यंत चालला होता. हा लढा भुत्तो यांनी विमानांमधून बॉम्बवर्षाव करून अत्यंत निर्दयीपणे संपुष्टात आणला.


 

या दडपशाहीमुळे बलुची अधिकच दुरावले. या लढ्याच्या वेळी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना मनात असूनही इराणला न दुखवण्याच्या भूमिकेमधून बलुचींना थेट मदत करता आली नाही. 

शिया-सुन्नी राजकारणाचे पडसाद 

बांगलादेश युद्धाचे पाकिस्तानच्या जनमानसावर काय परिणाम झाले याचा विशेष मागोवा आजवर भारतामध्ये घेतला गेलेला नाही. १९७५ पर्यंत चाललेल्या बलुचिस्तानातील बंडानंतर तेथील शिया समुदाय थंडावला. पण आपला अपमान तो विसरू शकत नव्हता. अफगाणिस्तानात रशियन प्रभाव वाढू लागल्याच्या बातम्या येत होत्या. त्या पाहाता या समुदायाने पुन्हा उचल खाल्ली आणि एप्रिल १९७९ मध्ये मुफ्ती झफर हुसेन आणि अल्लामा सय्यद मोहमद रिझवी यांच्या पुढाकारातून ‘तेहरिक-निफचे-फिका-जाफरिया’ या संघटनेचा जन्म झाला आणि मुफ्ती यांची पहिले अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. जनरल झिया यांच्या शियाविरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी संघटनेने जुलै १९८० मध्ये एक प्रचंड मोर्चा काढला. त्यामध्ये पाकिस्तानच्या लष्करी गुप्तचर खात्याच्या विरोधामध्येही निषेध नोंदवला गेला. 

या शिया संघटनेला पाकिस्तानच्या सर्व प्रांतामधून प्रचंड प्रतिसाद मिळाला ते पाहून त्याची दखल केवळ पाकिस्तानात नव्हे, तर सौदी अरेबिया, इराक आणि अमेरिकेलाही घ्यावी लागली. त्याचे खरे कारण असे की, या संघटनेचा इराणी गुप्तचरांशी संपर्क असल्याचे उघड झाले होते. व्यापक जनमत संघर्षात उतरविण्याच्या आंदोलनात इराणने रस घेतला हे पाहून या देशांची चलबिचल स्वाभाविक होती. त्यातच भुत्तो यांची पत्नी नुसरत ही जन्माने इराणी शिया असल्यामुळे संघटनेचा ओढा त्यांच्याकडे आणि पर्यायाने झिया यांचा राजकीय विरोधक पक्ष- Pakistani Peoples Party (PPP) कडे असल्याचेही स्पष्ट झाले होते. हे जनरल झिया यांच्या राजवटीला राजकीय आव्हान ठरू शकले असते. म्हणून या संघटनेला आव्हान देणारा गट स्थापन करण्यासाठी भारतीय पंजाब आणि हरियाणामधून आलेल्या सुन्नींना हाताशी धरण्यात आले. या कारवायांना सौदी, इराक तसेच अमेरिकेचाही पाठिंबा होता. याच हालचालींचा परिणाम म्हणून १९८४ मध्ये मौलाना हक नवाझ झांगवी यांच्या नेतृत्वाखाली ‘अंजुमन-ए-सिपाह-ए-सहाबा-पाकिस्तान’ या खतरनाक दहशतवादी गटाची स्थापना करण्यात आली. अशा तर्‍हेने सुन्नी शेतमजूरांच्या आर्थिक प्रश्‍नांना जातीय वळण देऊन जमीनदारांना म्हणजेच अर्थातच अगदी स्थापनेपासून या संघटनेने शियांना आपल्या दहशतवादी कारवायांचे लक्ष्य केले. पुढे अमेरिकेच्या संमतीने हीच स्थलांतरितांची फौज जनरल झियांनी अफगाणिस्तानच्या लढाईमध्ये लष्करी प्रशिक्षण देऊन वापरली. त्या काळामध्ये त्यांचा संबंध ओसामा बिन लादेन याच्या कट्टर वहाबी पंथियांशी आला. मुळात देवबंदी पंथाचे असल्यामुळे ओसामाबरोबर जिहादमध्ये सहभागी होण्यास स्थलांतरित उत्सुक होते. त्यामध्ये स्थलांतरितांना काहीही वैचारिक अडचण आली नाही. हरकत-उल-मुजाहिदीन, हरकत-उल-जिहाद, अल इस्लामी जैश-ए-मोहमद या संघटना सिपाह-ए-साहबा पाकिस्तान डडझ मधूनच जन्माला आल्या. १९९३ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला चढवणारा रमझी युसूफ याच संघटनेचा. १९९८ मध्ये इंटरनॅशनल इस्लामिक फोरम IIF ची घोषणा ओसामाने केली. त्यामध्येही हे गट सहभागी झाले होते. तसेच २००२ मध्ये डॅनियल पर्लचे अपहरण करून त्याला ठार मारणारे याच संघटनेचे सदस्य होते. SSP ने केवळ अफगाणिस्तानातच नव्हे, तर सौदी आणि इराकसाठी इराणविरोधात दहशतवादी हल्ले केल्याचे दिसते.

सिंध देश हे निवासी...

पाकिस्तानमधला तिसरा फुटीर गट म्हणजे सिंधी जनतेचा. १९१७ पासून सिंधी जनता आपल्यासाठी स्वतंत्र प्रांताची मागणी करत होती. ब्रिटिश गेले की सिंध्यांचे वेगळे राज्य स्थापन होईल आणि कॉंग्रेस त्याकामी आपल्याला मदत करेल, या भावनेमधून ते तत्कालीन कॉंग्रेसमध्ये सामील झाले होते. १९३६ मध्ये सिंध युनायटेड पार्टीची स्थापना केली गेली. सिंधी राष्ट्रभक्त जी. एम. सय्यद मुळात कॉंग्रेसमध्ये होते, पण त्यांनी कॉंग्रेस सोडून मुस्लीम लीगमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लीगचे वर्चस्व वाढले. कारण, त्यांच्यामागे सिंधी जनताही लीगमध्ये सामील झाली. त्या काळातील सिंधी प्रजा ब्रिटिशांची राजवट संपवण्यापुरतीच लीगबरोबर होती. ब्रिटिश गेले की त्यांना स्वतःचे राज्य हवे होते. पण तसे झाले नाही. भरीस भर म्हणून भारतामधून गेलेले मुहाजिर सिंधमध्येच वसतीला गेले. त्यामुळे व्यापारउदीम आणि नोकर्‍या यांच्यासाठी स्थानिक सिंध्यांचा त्यांच्याशी संघर्ष होऊ लागला. त्यातच कराची हे शहर केंद्रशासित ठरविण्यात आले. त्यामुळेे सिंधी लोकांची चीड वाढली.

‘वन युनिट’ योजनेने पूर्ण देशावर उर्दू भाषा लादल्यावर तर या संतापाचा स्फोट व्हायचा बाकी राहिला. कारण, सिंध्यांना त्यांची सिंधी भाषा प्रिय होती. १९७२ मध्ये भुत्तो यांची पार्टी सत्तेमध्ये आली तेव्हा सिंधच्या केवळ २% नागरिकांना पाकच्या सैन्यामध्ये प्रवेश देण्यात आला होता, तर सर्वोच्च ४८ पदांपैकी एकाही पदावर सिंधी अधिकारी नव्हता. भुत्तो यांनी या परिस्थितीमध्ये सुधारणा करण्याचे प्रयत्न केले. ७% मुहाजिरांना ३३% सरकारी पदे, तर स्थानिक सिंध्यांना मात्र ३% पदे इतका पराकोटीचा अन्याय होता. त्या काळामध्ये प्रांतिक सरकारने सिंधी ही प्रांताची भाषा ठरविण्याचा आदेश काढला. त्यावर चिडून मुहाजिरांनी हिंसक आंदोलन केले. कारण, ते उर्दूमध्ये बोलत. त्यामुळे उर्दूलाही समान दर्जा द्यावा लागला. पुढच्या काळात म्हणजे झिया सत्तारूढ झाल्यावर झिया यांच्या हुकूमशाही राजवटीविरोधात आणि लोकशाहीसाठी जे आंदोलन चालले होते, त्याला सर्वात जास्त पाठिंबा सिंधमधूनच मिळत होता. त्यांना शह म्हणून झिया यांनी मुहाजिरांना हाताशी धरून ‘मुहाजिर कौमी मूव्हमेंट’ MQMची स्थापना केली. त्याचे प्रमुख अल्ताफ हुसेन होते. MQM ने जी. एम. सय्यद यांच्या ‘सिंधू देश’ या पक्षाशी कडवे वैर धरले आणि त्यांच्या बरोबरीने भुत्तो आणि त्यांचा पक्ष PPP यांना राजकीय शह देणार्‍या उचापती घडवून आणल्या. १९८८-९०च्या काळामध्ये बेनझीर पंतप्रधान झाल्या तेव्हा पक्ष आयएसआयलाही दाद देईना. त्याचा परिणाम म्हणून कॉर्प्स कमांडर जनरल आसिफ नवाझ जांजुआ यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या मुहाजिरांमध्ये सुन्नी आणि शिया अशी फाटाफूट घडवून आणली आणि अल्ताफ यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न केला. ते करण्यात फारसे यश मिळाले नाही, तेव्हा उत्तर प्रदेश विरुद्ध बिहारी मुहाजिर अशी फूट पाडून MQM-H अशा नव्या पक्षाची स्थापना केली गेली. MQM-H या नव्या पक्षाने आयएसआयकडून प्रशिक्षण घेऊन सिंधी राष्ट्रवाद्यांच्या हत्या घडवून आणल्या. MQM-Hने पुढे SSPशी हातमिळवणी केली आणि सिंधमधील शिया मुहाजिरांचे हत्याकांड घडवून आणले. अशा तर्‍हेने शिया सुन्नी वादाचे-दहशतवादाचे लोण सैन्याच्या पुढाकाराने सिंधपर्यंत पोहोचले.

१९९९ मध्ये मुशर्रफ सत्तेमध्ये आले तेव्हा त्यांनाही डडझ, MQM-H या संघटनांचा वापर आपल्या राजकीय उद्देशांसाठी करून घेण्याचा मोह टाळता आला नाही. मुशर्रफ यांच्या काळामध्ये तर असे सामाजिक संघर्ष केवळ सुन्नी वि. शिया असे स्वरूपाचे न राहता, त्यामध्ये बरेलवी सुन्नी विरुद्ध देवबंदी अथवा वहाबी सुन्नी अशा संघर्षाची भर पडली आणि वातावरण अधिकच बिघडले. देवबंदी सुन्नींकरिता पैसा सौदी अरेबियामधून येऊ लागला. त्याखेरीज अमेरिका आणि अन्य पाश्चात्त्य देशही हत्यारे आणि आयुधे पुरवत होती.

पाकिस्तान नव्हे, पख्तूनिस्तान

पाकिस्तानच्या NWFPप्रांताची कहाणी वेगळी सांगायला नको. इथल्या पश्तूनांना पंजाबी मुसलमानांचे वर्चस्व मान्य होणे अशक्य होते. अफगाणिस्तानशी अडीच हजार किलोमीटर सीमा असलेल्या प्रांतामधले पश्तून आणि अफगाणिस्तानच्या सीमेपलीकडे राहणारे पश्तून ही एकच जमात आहे. तिने अफगाणिस्तानवर दीडशे वर्षे राज्य केले आहे. काबूलमध्ये बसलेले कोणी परकीय राज्यकर्ते असोत की अफगाणी, ही आत्यंतिक स्वातंत्र्यप्रिय जमात कोणालाही राज्यकर्ता म्हणून स्वीकारत नाही, हा इतिहास आहे आणि सध्याच्या काळात त्याची प्रचिती अमेरिकेलाही आलेली आहे. खान अब्दुल गफार खान उर्फ सरहद्द गांधी यांनी स्वतंत्र पख्तूनिस्तानची मागणी त्या काळामध्येच केली होती. शेजारच्या FT मध्येही तीच परिस्थिती आहे. इथेही अनेक आदिवासी टोळ्या राहतात आणि आपापल्या परंपरेनुसार टोळीच्या नियमांनुसार आपला कारभार चालवतात. इथे पाकिस्तानची केंद्रीय सत्ता चालत नाही आणि तसा फारसा प्रयत्नही कोणते सरकार करत नाही. 

असा इतिहास असलेल्या पाकिस्तानचे प्रत्यक्षातले स्वरूप म्हणूनच एखाद्या संत्र्याप्रमाणे आहे असे आपल्या लक्षात येईल. एक वरचे साल काढण्याचाच अवकाश आहे की, आतल्या फोडी आपसूकच वेगळ्या होऊ लागतील. वरकरणी एकसंध वाटणारा पाकिस्तान आतून पुरता पोखरून निघाला आहे. आपले राजकीय उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी त्याने हिंसक कारवायासुद्धा भारतामधूनच आलेल्या मुहाजिरांकडून करवून घेतल्या, यातच तेथील राज्यकर्त्यांची कोती भूमिका स्पष्ट होते. म्हणूनच कोणी ठरवलेच तर हा देश ठिणगी पडताच भसाभसा पेटत जाईल आणि कोसळून पडेल याची जाणीव तेथील जनतेला होत आहे. पण या जाणत्या जनतेच्या हाती करण्यासारखे काही उरले नाही. कधी अमेरिका, तर कधी चीनच्या आडोशाने मत्सर आणि द्वेषमूलक राजकारण करून केवळ भारताला अपशकुन करून खाली खेचण्याचे एकमेव काम आजवर इमानाने करण्यात आले आहे. जबरदस्त इच्छाशक्ती असलेले भारत सरकार सत्तेवर असेपर्यंत त्याने ठरवले तर हे काम अवघड जाणार नाही, असे परिस्थिती सांगत आहे.

 - स्वाती तोरसेकर

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.