एखाद्याने लै ‘फोर्स’ केला, तरच बघा...

    19-Nov-2016
Total Views |

विद्युत जामवाल या अभिनेत्याने 2011 साली हिंदी चित्रपट सृष्टीत प्रवेश केला आणि पहिल्याच चित्रपटातून म्हणजेच ‘फोर्स’ मधून व्हिलनची भूमिका साकारून त्याने ‘व्हिलन’ या कॅटेगरीला वेगळे आयाम प्राप्त करून दिले होते. अर्थात त्याच्या सोबतीला जॉन अब्राहम होता, पण या चित्रपटात खरे वर्चस्व गाजवले ते विद्युतनेच. शिवाय निशिकांत कामतचे वेगळ्या धाटणीचे दिग्दर्शनही या चित्रपटाला लाभल्याने तो यशस्वी ठरला होता. याच ‘फोर्स’चा दुसरा भाग म्हणजे ‘फोर्स-2’ हा चित्रपट घेऊन जॉन अब्राहम आणि सोनाक्षी सिन्हा या आठवड्यात आपल्या भेटीला आले आहे. या चित्रपटाची सुरूवात अतिशय वेगवान घडामोडींनी होते खरी पण त्यानंतर कथानकात मांडण्यात आलेल्या गोष्टींमध्ये ‘लॉजिक’ नावाचा प्रकारच कुठे आढळत नाही. म्हणूनच म्हणतोय अभिनय देवचा हा ‘फोर्स-2’ पाहण्यासाठी कोणी खूपच आग्रह करीत असेल, तरच तो बघा. अन्यथा काही दिवसातच तो टीव्हीवर दिसेलच...

फोर्स-2 ची कथा चीनमधल्या ‘रॉ-एजंट’ भोवती गुंफण्यात आली आहे. तिथल्या 20 रॉ एजंट पैकी तिघांचा सुरूवातीलाच खून होतो. या तिघांपैकी एक जण हा एसीपी यशवर्धनचा (जॉन अब्राहम) जिवलग मित्र असतो. तो मित्र मरण्यापूर्वी यशवर्धनला एक संदेश पाठवतो. हा संदेश यशवर्धन ‘रॉ’च्या प्रमुखांना दाखवतो. मित्राच्या खुनाचा बदला घेण्यासाठी व या शडयंत्रामागे नेमकं कोणं आहे याचा तपास करण्यासाठी रॉ एजंट कमलजीत कौर उर्फ केके (सोनाक्षी सिन्हा) हिला सोबत घेऊन यशवर्धन थेट चीनमध्ये जातो. चीनला गेल्यावर काय घडतं, या मागचा मास्टरमाईंड सापाडतो का आणि तो हे सगळं कशासाठी करीत असतो या प्रश्‍नांची उत्तर तुम्हाला ‘फोर्स-2’ पाहिल्यावरच मिळू शकतील.

सुरूवातीचा काही काळ प्रेक्षक या चित्रपटाशी बांधला जातो, त्याची उत्सुकता ही ताणली जाते, पण थोड्याच ही पकड हळूहळू सैल होत गेलीये. याच मुळ कारण म्हणजे चित्रपटात ज्या गोष्टी दाखवल्यात त्यातील बहुतांश गोष्टींचा लॉजिकच नाहीये. उदाहरणार्थ तीन-चार गोष्टींचा उल्लेख इथे करणं क्रमप्राप्त आहे. एकतर मुंबई पोलीसमधला ‘एसीपी’ रॉच्या मिशनवर जातो, दुसरी गोष्ट म्हणजे रॉची एजंट असणार्‍या ‘केके’ला गोळी झाडायची भिती वाटते, तिसरी गोष्ट 2012 मध्ये मिसुरडही न फुटलेला तरूण अवघ्या चार वर्षात ‘रॉ’च्या यंत्रणेला धक्का कसा पोहचवू शकतो आणि सर्वात आश्‍चर्यचकीत करणारी गोष्ट म्हणजे मुंबई पोलीसांच्या खबर्‍यांना ‘रॉ‘पेक्षा जास्त माहिती असते किंवा ते त्यांच्यापेक्षा अधिक हुशार असतात. या व यांसारख्या अनेक गोष्टींमध्ये काही तथ्यच जाणवत नाही. आणि अखेरीस ज्या कारणामुळे हे सगळं घडवून आणलं जातयं हे कळाल्यावर तर डोक्यावर हात मारायचीच वेळ येते.

या चित्रपटात जॉन अब्राहम, सोनाक्षी सिन्हा आणि ताहीर राज भसीन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. या तिघांपैकी ताहीर कडून जास्त अपेक्षा होती. त्यानी मर्दानीमध्ये रंगवलेला व्हिलन अधिक प्रभावी वाटला होता. पण ‘फोर्स-2’मध्ये ताहीरची ती जादू दिसली नाही किंबहुना त्याला तितका वावच दिला नाही. अकीरा नंतर सोनाक्षीने ही भूमिका हा स्वीकारली असेल याच उत्तर काही मिळत नाही. इंडस्ट्रीमधल्या एखाद्या नवख्या अभिनेत्रीने देखील ही भूमिका केली असती तरी चाललं असतं. मोठं मोठ्याने ‘यश’-‘यश’ असं ओरडण्या पलिकडे तीने एकदाच काय ते फायटिंग केली आहे बाकी सगळं शून्य. राहता राहीला विषय जॉनचा. त्याने आजपर्यंत केलेल्या चित्रपटात तो खरा अभिनेता म्हणून मद्रास कॅफे, धूम आणि फोर्समधूनच समोर आला आहे. बाकी बहुतांश चित्रपटात त्याचा एकसुरी अभिनयच दिसून येतो. ‘फोर्स-2’देखील त्याला अपवाद ठरला नाहीये. सीन फायटिंगचा असो किंवा इमोशनल असो जॉनच्या चेहर्‍यावरचे भाव कायम एकच असतो. जॉनचं शरीर अधिकाधिक पिळदार होत आहे, पहिल्या फोर्समध्ये त्याने मोटारसायकल उचलली होती, फोर्स-2 मध्ये तो कार उचलताना दिसतो आता फोर्स-3 आला आणि त्यात त्याने ट्रक उचलला तर आश्‍चर्य वाटायला नको. चित्रपट निर्माता आणि मॉडेल म्हणून तो जास्त पैसे कमवू शकतो आणि लोकप्रियही होऊ शकतो.

देल्ली बेली आणि गेम या चित्रपटाचे तसेच ‘24-सिझन-2’ या मालिकेचे दिग्दर्शन करणार्‍या अभिनय देव याने ‘फोर्स-2’ दिग्दर्शित केलाय. पहिल्या चित्रपटाचा दुसरा भाग काढताना दिग्दर्शक न बदलता तोच ठेवल्यास दुसर्‍या भागावर त्याचा नक्की सकारात्मक परिणाम होईल. पण आपल्याकडे असे न करता प्रत्येक भागाला नवीन दिग्दर्शक नेमण्यात येतो. ‘रॉक ऑन-2’ला ही असेच करण्यात आले होते, कदाचित चित्रपट अयशस्वी होण्यामागे हे मुख्य कारणही असू शकते. ‘फोर्स-2’च्या सिनेमॅटोग्राफरने मात्र उत्तम काम केलाय. चित्रपटातील लोकेशन्सची निवड आणि त्याला अनुसरून केलेले चित्रिकरण कमाल आहे. शिवाय अ‍ॅक्शन सीन्सपण मस्त जमून आलेत. पण शेवटी तर्कशास्त्र नावाची काही गोष्ट असते, याचाच अभाव चित्रपटाच्या कथेमध्ये अनेकदा जाणवतो.

एकंदरीतच 500-1000 च्या नोटांच्या विषयाशिवाय दुसर काहीतरी पाहण्याची किंवा ऐकण्याची इच्छा असेल तर डोक बाजूला ठेवून ‘फोर्स-2’ नक्की बघा... बेस्ट ऑफ लक!
----