"अती परिचयात अवज्ञा" होते बहुधा आपली वांग्याच्या बाबतीत मित्रांनो आणि मैत्रिणींनो..
मधुमेह कंट्रोल मध्ये ठेवण्यास अत्यंत गुणकारी , कोलास्त्रोल वर नियंत्रित ठेवणारा आणि त्यामुळे रक्तदाबावर ही कंट्रोल ठेवणारे वांगे, मेंदूच्या पेशींना बाह्य घटकांपासून धोका पोहोचवण्यास वांगे मदत करते, शरीरात लोहाची मात्रा योग्य प्रमाणात ठेवण्यात वांगे मदत करते, वांग्यात पाण्याचे प्रमाण जास्त असते आणि कॅलरीज कमी असतात त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास वांगे मदत करते, वांग्यांमध्ये असणाऱ्या मुबलक फायबर्स मुळे शरीरातल्या अन्न पचन करणाऱ्या रचना व्यवस्थित कार्यरत राहतात, आपल्याला कदाचित ठावूक नसेल पण वांगी आपली स्कीन छान ठेवण्यास खूप खूप मदत करतात इत्यादी इत्यादी...
आणि यापेक्षा ही सगळ्यात महत्वाचे म्हणजे वांगी ही छान आणि योग्य पद्धतीने केली तर चवीला सुद्धा भन्नाट होतात यार.....जबऱ्या

आता थंडी पडली आहे त्यामुळे ही पांढरी वांगी मिळतात मस्त बाजारात मुबलक.... घ्या आणि सुरु करा ही डिश करायला.
-साहित्य
(साधारण - चार जणांसाठी)
पांढरी जळगावी भरीताची ताजी वांगी - अर्धा किलो (ही वांगी निवडताना फार मोठी वांगी घेऊ नये आणि मस्त चकचकीत आणि ताजी साधारण कडक पण हलकेच मऊ अशी निवडावीत )
मध्यम तिखट हिरव्या मिरच्या - ५/६ (आत्ता पावसाळ्याचा सिझन असल्याने मिरच्या तिखटाच असतात तेव्हा आधी मिरचीची किंचित चव घेऊन बघा आणि आवश्यकतेनुसार मिरच्या वापरा. हे भरीत झणझणीत च जबरा लागते...लेकीन पसंद अपनी अपनी) ,
लसुण पाकळ्या - साधारण ८/१०
कांद्याची पात - कोवळी हिरवीगार कांद्याची पात (पात लहानशी असावी आणि कांदे जितके जास्त लहान असतील तितकी ही पात छान लागते, पात जास्त असेल तर भरीत मस्त लागते त्यामुळे आवश्यकता असेल तर दोन जुड्या घ्याव्यात)
कच्चे शेंगदाणे - एक छोटी वाटी भर (जास्त कच्चे शेंगदाणे मस्त लागतात आणि आवडत असतील तर नक्की जास्त वापरा जबऱ्या लागतात या भरतामध्ये - कुठल्याही परिस्थितीत भाजलेले घेऊ नका, माझ्यावर विश्वास ठेवा...जबऱ्या लागतात )
तेल - ५ चमचे (जरा जास्त तेल छान लागते, आपण नेहेमी जास्त तेल खात नाही त्यामुळे या डिश ला कधीतरी जास्त तेल खाल्लेत तर काही बिघडत नाही, या डिश मध्ये जास्त तेल वापरून खा.... बाकी नंतर तेल कमी वापरा दिवसभर...वापरले नाहीत तर उत्तम )
कृती-

१) पहिल्यांदा मिरच्या तेलावर भाजुन , बऱ्यापैकी काळसर करून, लसुण आणि या भाजलेल्या मिरच्या असा ठेचा करुन घ्यावा.
(मिक्सर अजिबात वापरू नका यार. मी घरी असलेल्या खल-बत्यात ठेचतो हा खर्डा...जबऱ्या लागते म्हणून ही डिश...बिलीव्ह मी )
२) कांद्याची पात आधी धुवून घ्या आणि त्याला असलेला कांदा आणि पात ही मस्त बारीक चिरून घ्या.
३) आता आपली मुख्य जळगावी पांढरी वांगी मस्त धुवून घ्या.
आता या वांग्यांना प्रत्येकी ५/६ ठिकाणी टोचून आता त्याला मस्त तेलाचा एक हात फिरवून ५ मिनिटे हि वांगी तशीच उघड्यावर ठेवा...फक्त ५
मिनिटे..जास्त नाही...
आता ही वांगी थेट अग्नीवर ठेवा आणि फिरवत फिरवत भाजून घ्या.. .साल चांगली काळी पडून पाणी सुटलेले दिसेस्तोवर भाजा.
सर्व बाजुने छान खरपुस भाजल्यानंतर आता ही सगळी वांगी थोडा वेळ खाली उतरवून एका प्लेट मध्ये थंड होऊ द्या.
आता देठ काढुन भाजला गेलेला वांग्यांचा गर एका प्लेट मध्ये काढून घ्या आणि मग मस्त पैकी एकत्र करून ठेचून ठेचुन घ्या.
४) शक्य असेल तर ही भरीताची डिश लोखंडी कढइत करा. भन्नाट लागते. घरी मातीचे भांडे असेल तर हेवन...
या आपल्या भांड्यात आता सर्व तेल टाकुन पुरेसे गरम झाल्यावर त्यात आधी शेंगदाणे टाका आणि चांगले काळे होईपर्यंत परतत परतत तळून घ्या.
५) आता या तेलात शेंगदाणे तसेच ठेवून त्यात आपण मगाशी केलेला मिरची-लसणाचा खर्डा हळुवार सोडा आणि मंद अग्नीवर परतत परतत परतून घ्या...
आता भन्नाट लजीज खाट सुटलेला आहे... पण घाबरू नका... डिश भन्नाट होणार आहे..
विश्वास ठेवा... पेशंस ठेवा...
६) खाट सुटल्या सुटल्या यात दोन चमचे मीठ आणि एक चमचा साखर घालून मंद अग्नीवर एक मिनिटे परतून घ्या.
७) आता या मिश्रणात कांदा आणि चिरलेली कांद्याची पात सरकवा आणि मस्त परतून घ्या.. पाणी अजिबात घालू नका.
८) आता या सगळ्यात भाजलेल्या वांग्यांचा लगदा घाला आणी हळूवार पण सतत हलवत भरीत मस्त परतुन घ्या.
आता यावर अगदी किंचित पण मस्त चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घाला...थोडीशीच आणि आवडत असेल तर शेवटी लिंबू पिळा...
लिंबाच्या सान्निध्यात तिखटाचा स्वाद मस्त खुलतो नेहेमीच...
लक्ष्यात ठेवा.
आता वेळ आली आहे प्लेटिंग ची...
मस्त प्लेट्स घ्या...
गरमागरम सर्व्ह करा आणि मस्त फुललेल्या पोळ्यासोबत चोपा जोरदार...
नुसत्या गरमागरम भाता सोबत पण भन्नाट लागते हि दिः मित्रांनो...
फक्त भाता सोबत खाताना कदाचित किंचित मीठ अजून घ्यावे लागेल भातावर आणि यावर लिंबू पिळा...स्वर्ग...स्वर्ग...आणि निव्वळ स्वर्ग
आणि गरमागरम पोळीसोबत मस्त जेवण सुरु करा...
अरे थांबा थांबा यार....
आचमन केलेत का ?
जेवणा पूर्वी २ घोट पाणी पिऊन घ्या...
हात जोडून देवाचे स्मरण करा...भोजन मंत्र म्हणा आणि..
आता करा सुरुवात...
रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...
आणि ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....
भरपेट खा...आरोग्यदायी रहा..खूष व्हा...मस्त जगा .... देव बरा करो.........
मिलिंद वेर्लेकर