डोळ्यांचे पारणं फेडणारा संगीतमय ‘मिर्झ्या!’

    08-Oct-2016
Total Views |


एक युवक स्लो-मोशनमध्ये घोडेस्वारी करत नदी पार करतो, आजूबाजूला बर्फाळ प्रदेश असतो, घोड्यांचे व पाण्याचे आवाज येतात, इंग्रजी चित्रपट 300ची आठवण करून देणारी युद्धाची दृश्यही दिसू लागतात आणि समोर दिसतो तो ‘मिर्झ्या’... एकमद भारी वाटलं ‘मिर्झ्या’ चित्रपटाचा हा सुरूवातीचा सीन बघून... पण या सीनमधील ‘स्लो-मोशन’ पुुढे कथेमध्येही इतक पसरलं आहे की, त्या प्रेमकहाणीतला आत्माच निघून गेल्यासारखे वाटते. गुलजार यांनी अनेक वर्षांनंतर ‘मिर्झ्या’च्या निमित्ताने चित्रपटाची कथा लिहीली आहे. पण यामध्ये त्यांचे वेगळे अस्तित्त्वच जाणतव नाही. मुळात कथा-पटकथेमध्येच त्रुटी असल्याने राकेश ओमप्रकाश मेहरा सारख्या प्रतिभावान दिग्दर्शकालाही ‘मिर्झ्या’मध्ये कोणतीही कमाल करता आली नाही.

पंजाबमधील मिर्झा-साहिबान यांची प्रेमकहाणी जगप्रसिद्ध आहे. याच प्रेमकहाणीवर आधारित चित्रपट काढण्याच्या उद्देशाने मेहरा यांनी ‘मिर्झ्या’ची निर्मिती केली. यामध्ये मुळ कथेसह त्याचा समकालीन प्रेमकथेशी संबंध जोडण्यात आला आहे. चित्रपट एकाच वेळी आपल्याला तीन गोष्टीं पडद्यावर दाखवतो त्यामुळे तो अधिक क्लिष्ट झाला आहे. सुचित्रा (सयंमी खेर) आणि मुनीश (हर्षवर्धन कपूर) यांची राजस्थानमधील ही कथा. शाळेपासूनच सुचित्रावर बेहद प्रेम करणारा मुनीश तिला गुरूजींनी शिक्षा केल्यामुळे थेट त्यांचाच गोळी घालून खून करतो. त्याला अटक होऊन बाल सुधारगृहात टाकण्यात येते. मग पठ्ठ्या तिथूनही पळून जातो आणि सुचित्रा मात्र राजस्थान सोडून परदेशात जाते. कालांतराने दोघं मोठे होतात, मुनीश आदिल या नावासह त्याच राज्यातील दुसर्‍या शहरात वावरत असतो. दरम्यान सुचित्रा तिचे शिक्षण पूर्ण करून पुुन्हा राजस्थानमध्ये येते. तिचे लग्न राजकुमार करणशी ठरत आणि आता या राजकुमारचे घोडे सांभळण्याचे काम आदिल करत आहे. मग पुढे काय दोघं पुन्हा भेटतात, जुन्या आठवणी, उत्कट प्रेम, करणशी लग्न नाकारून पळून जाणे आणि.........

रंग दे बसंती, दिल्ली 6, भाग मिल्खा भाग सारखे सुपरहीट चित्रपट देणार्‍या राकेश ओमप्रकाश मेहरांनी ‘मिर्झ्या’च्या कहाणीमध्ये नक्की काय नावीन्य पाहिले ठाऊक नाही. मांडणी आणि दिग्दर्शनात मेहरा यांनी कसोशिने प्रयत्न केलाय पण कथेतील कच्चे दुवे चित्रपटाला अपयशाकडे खेचून नेतात. प्रत्येक काही मिनिटांनी ‘ओय मिर्झ्या याऽऽऽ’ हे बॅकग्राऊंड म्युझिक टाकण्याची काहीही आवश्यकता नव्हती. लक्षात येतील इतके संवादांचे प्रमाण कमी आणि गाण्यांचे जास्त आहे. चित्रपटात एकूण नऊ गाण्यांचा भरणा केला आहे. यातील काही गाणी नक्कीच उत्तम आहेत, पण काहींची अनावश्यकता वेळोवेळी जाणवते. त्यामुळे चित्रपट अधिक संथ झाला आहे. प्रत्येक गाण्याच्या शब्दांना अर्थ आहे, शंकर-एहसान-लॉय यांचे संगीतही चांगले आहे पण एकाच गोष्टीचं सातत्य होत राहीलं की रसिकही कंटळतात. अखेरच्या काही सीन्स्मध्ये ‘सैराट’ची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. (यापुढील अशा धाटणीच्या अजून काही प्रेमकहाण्यांनातरी ‘सैराट’चा प्रभाव सहन करावा लागणार आहे.)

अभिनयाबाबत काय सांगणार, कारण इतक्या मोठ्या चित्रपटात सर्वात जास्त अपेक्षा असतात त्या मुख्य कलाकारांकडूनच, पण हर्षवर्धन आणि संयमीला शिकण्यासाठी अजून प्रचंड वाव असल्याचे लक्षात येते. त्यातल्या त्यात या दोघांच्याही वेगळ्या लूकमुळे थोडाफार प्रभाव रसिकांवर पडू शकतो. मला सगळ्यात जास्त काम आवडलं ते अंजली पाटीलचे. केवळ डोळ्यातून आणि हावभावातूनही सक्षम अभिनय करता येतो हे तिने पुन्हा एकदा सिद्ध केलयं. ओम पुरीच्या वाट्याला फारच थोडा अभिनय आलाय, त्यामुळे त्याचे वेगळेपण ठसत नाही.

या चित्रपटाची सर्वात जमेची बाजू म्हणजे छायाकार पावेल डायलस यांनी केलेले चित्रीकरण. लडाखमधले सीन्स् तर अफलातून, लाजवाब, कमाल! राजस्थानमधले राजवाडे, किल्ले, बैठ्या घरांची पद्धत याचेही चित्रण उत्तम झाले आहे. जर कोणाला खरच ‘मिर्झ्या’बघण्याची उत्सुकता असेल तर त्यांनी केवळ आणि केवळ व्हिज्युअल्स्साठी हा चित्रपट बघावा. अ‍ॅक्शन सीन्स तसे फारसे नाहीयेत, पण एक-दोन सीनसाठी अ‍ॅक्शन दिग्दर्शक डॅनी बाल्डवीनने करून घेतलेली मेहनत दिसून येते. युद्धाचे काही सीन्स इतके भारी जमलेत की, त्यांना ‘थ्रीडी इफेक्ट’ असायला पाहिजे होते असे वाटत राहते.

अखेरीस कसं असतं ना, चित्रपट म्हणला की मनोरंजन पाहिजे, श्रवणीय गाणी पाहिजेत, अ‍ॅक्शन पाहिजे, प्रेमकहाणी म्हटलं तर ‘रोमॉन्स’ पाहिजे... हे सगळ ‘मिर्झ्या’मध्ये आहेच. पण तरीही का कोणास ठाऊक ‘मिर्झ्या’ मनाला भिडत नाही... भिडतात ती फक्त आणि फक्त त्यातही विलोभनीय दृश्य!!!