विराटच्या ‘आर्मी’नेही पाकिस्तानला खेचले खाली!

    04-Oct-2016
Total Views |


जम्मू-काश्मिरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील 46 रायफल कँपवर रविवारी रात्री दहशतवाद्यांनी हल्ला केला. सीमा सुरक्षा दल आणि लष्कराच्या जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले, यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असून भारताचा एक जवान शहीद झाला आहे. त्याचबरोबर मागील आठवड्यात ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून भारतीय सैनिकांनी सीमारेषेवरील सुमारे 38 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले तर अनेकांना जखमी केले. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांची दखल आता जागतिक पातळीवर घेतली जात असून गेल्या दोन आठवड्यात अनेक मोठ्या देशांनीही विविध माध्यमातून पाकिस्तानच्या विराधोत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. एकीकडे जम्मू-काश्मिरला युद्धभुमीचे स्वरूप प्राप्त झाले असून पुढील काळात हा संघर्ष अधिकाधिक पेट घेणार असे चित्र आहे. तर दुसरीकडे खेळपट्टीच्या मैदानावरही भारतीय क्रिकेट टीम एकाअर्थी पाकिस्तानला नामोहरम करण्याच्या दृष्टीनेच न्यूझीलंडशी चार हात करीत असल्याचे दिसून येत आहे. सामना जरी न्यूझीलंडविरूद्धचा असला तरी उद्दिष्ट काय होते याबाबत आपण सर्वच जाणते आहोत...

सीमेवरील घडामोडींचा किंवा एकूणच पाकिस्तानशी चिघळत चाललेल्या आपल्या संबंधांचा मैदानातील खेळाशी दुरान्वये संबंध नसला तरी तो यानिमित्ताने जोडला जाणारच यात तिळमात्र शंका नाही. क्षेत्र कोणतेही असो, भारताने पाकिस्तानला चितपट केल्याचा प्रत्येक क्षण प्रत्येक भारतीय सध्याच्या तापलेल्या मोहोलमध्ये सेलिब्रेट करणारच!

विराट कोहलीच्या तरूण नेतृत्त्वाखाली न्यूझीलंड विरूद्ध कसोटी सामना खेळण्यास उतरलेली टीम इंडिया भलतीच फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. पहिल्या आणि दुसर्‍या सामन्याबरोबरच न्यूझीलंडविरूद्धची मालिका काल भारताने जिंकली असून या विजयामुळे अव्वल स्थानी असणार्‍या पाकिस्तानच्या संघाला कसोटी क्रिकेटच्या क्रमवारीतून पायउतार व्हावं लागणार आहे. न्यूझीलंडविरूद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी पाकिस्तान 111 गुणांसह पहिल्या क्रंमाकावर होते तर भारताचे स्थान (110 गुण) दुसरे होते. परंतु सलग दोन कसोटी सामने जिंकल्यामुळे भारताने आता पाकिस्तानला खाली खेचले असून अव्वल स्थानावर बाजी मारली आहे.

हा विजय एकट्या विराट कोहलीचा नसून तो विजय आहे विराटच्या या तरूण-तडफदार ‘आर्मी’चा! यात टीममधील प्रत्येक खेळाडूचे योगदान मोलाचे आहे. दोन्ही कसोटी सामन्यात रविंद्र जडेजा आणि आर. आश्‍विनने जबरदस्त गोलंदाजी करीत किवींच्या तोंडचे पाणी पळविले. त्याचबरोबर दुसर्‍या सामन्यात भुवनेश्‍वर कुमार व मोहम्मद शामीनेही भेदक मारा करीत न्यूझीलंडच्या फलंदाजांना नामोहरम केले. रोहित शर्मा, मुरली विजय, वृद्धिमान सहा, चेतेश्‍वर पुजारा, रविंद्र जडेजा यांच्या फलंदाजीनेही भारताच्या डावाला आकार दिला. त्यामुळेच हा विजय सांघिक आहे, असेच म्हणावे लागेल. या सर्वच तरूण खेळाडूंचा आत्मविश्‍वास आणि त्यांची ‘बॉडी लँग्वेज’ प्रत्येक क्षणाला निष्कुन एकच सांगण्याचा प्रयत्न करीत होती की, ‘आम्ही नंबर वन आहोत आणि तो नंबर आम्ही मिळवणारच!’

तसं बघितलं तर विराट कोहलीचा दोन्ही सामन्यातील खेळ चांगला झाला नाही. परंतु कप्तान म्हणून मैदानावरचा त्याचा वावर, त्याच्या व्यूहरचना, अ‍ॅरोगन्स् या सगळ्यागोष्टी सहकार्‍यांना प्रेरणा देणार्‍याच असतात. त्यामुळेच विराटचे नाव अग्रस्थानी घ्यावे लागेल. पाकिस्तानला खाली खेचून भारताने मिळविलेले हे अव्वल स्थान प्रत्यक्ष पाकिस्तानशी जिंकून मिळविले असते तर करोडो भारतीयांना त्याचा अधिक आनंद झाला असता. पण तरीही सध्याच्या एकूणच भारत-पाकिस्तान चकमकीमध्ये क्रिकेटच्या क्षेत्रात घडलेली ही गोष्ट देखील भारतीयांना आनंद देणारीच आहे. कारण स्पष्ट आहे, आपल्या विजयामुळे त्यांना पायउतार व्हाव लागतयं!

‘आयसीसी’चे अधिकृत मानांकन बघितल्यास आजही पाकिस्तानच क्रमांक एकवर असल्याचे दिसते. ‘आयसीसी’च्या नियमानुसार एखादी मालिका पूर्ण झाल्याशिवाय क्रमवारीमध्ये फेरबदल करता येत नाहीत. सध्याचा आकडेवारीचा खेळ असा आहे की, भारताने ही मालिका 3-0 अशी निर्विवाद जिंकली तर भारत 115 गुणांसह अव्वल स्थानी पोहचेल. जर सद्यस्थितीचा म्हणजे 2-0 चा विचार केला तरीही आपण आत्ता 113 गुणांसह पाकिस्तानच्या पुढे गेलो आहोत. मात्र तिसर्‍या सामन्यात न्यूझीलंडने भारताला मोठ्या फरकाने हरवले तर मात्र कदाचित आपल्याला 111 गुणांसह पाकिस्तानसोबत संयुक्तिकरीत्या अव्वल स्थानाचे भागीदार व्हावे लागेल.

पाकिस्तान विरूद्ध वेस्टइंडिजची तीन कसोटी सामन्यांची मालिका 13 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. तर पुढील महिन्यात लगेचच 9 नोव्हेंबरपासून भारत इंग्लडविरूद्ध तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी मैदानात उतरणार आहे. खेळात कधीही काहीही होऊ शकतं. वेस्टइंडिज विरूद्धच्या मालिकेत पाकिस्तानने चांगला खेळ केला तरी पुन्हा त्याचा वचपा काढण्यासाठी विराटची ‘आर्मी’ इंग्लड मालिकेत नव्या जोमाने तयार असणार आहे. भविष्यात काय घडेल माहित नाही पण सध्या तरी आपण अव्वल स्थानी असल्याचा आनंद सेलिब्रेट करू..!
जय हिंद...जय भारत!!!