सुशांत सिंगचा मास्टर स्ट्रोक!

    03-Oct-2016
Total Views |

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

महेंद्रसिंग धोनी! क्रिकेट जगतातलं मोठं नावं! असं नावं कमवायला लोकांना दोन दशकही पुरत नाहीत तेच या तरूणाने अवघ्या एका दशकात करून दाखवलं. विश्‍वकरंडक, टी-20 विश्‍वकरंडक आणि चॅम्पियन ट्रॉफी या क्रिकेटमधील तिनही मोठ्या स्पर्धांमध्ये भारताला यश मिळवून देणारा धोनी हा एकमेव कर्णधार आहे. पण या यशापर्यंत पोहचण्यासाठी त्याची धडपड, या खेळातील त्याची सुरूवात, एकूण प्रवासात आलेल्या अडचणी आणि त्यावर त्यानी केलेली मात तसेच लाखो भारतीयांना माहित नसलेली त्याची प्रेमकहाणी हे सारं निरज पांडे या हरहुन्नररी दिग्दर्शकाने ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’मधून मांडलं आहे.

सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, राहुल द्रवीड या त्रिकुटानी आकार दिलेल्या भारतीय क्रिकेट टीमला नंतर महेंद्रसिंग धोनीने एका वेगळ्याच शिखरावर नेऊन पोहचवले. हा प्रवास करताना धोनीलाही कधी स्वप्नातही वाटल नसेल की आपल्या आयुष्यावर इतक्या लवकर चित्रपट बनवला जाईल. पण हीच तर नियतीची जादू असते ना...अर्थात त्याला धोनीच्या कष्टाची आणि त्याच्या कतृत्त्वाची जोड आहेच! चित्रपटाच्या नावातच ‘अनटोल्ड स्टोरी’ असं असल्याने आजपर्यंत आपण जे धोनीला बघितलयं, त्याच्याबद्दल ऐकलयं त्यापलिकडे जाऊन हा चित्रपट आपल्यासमोर अनेक गोष्टी मांडतो. धोनीच्या आयुष्यात त्याच्या शाळेतले बॅनर्जी सर आलेच नसते तर कदाचित तो आज फुटबॉलमध्ये गोलकिपर झाला असता किंवा धोनीच्या मित्रांनी त्याला वेळोवेळी मोलाची साथ दिलीच नसती तर आणि त्याच्या घरचे त्याच्या खंबीरपणे पाठिशी उभे राहीले नसते तर तो आज रेल्वेमध्ये मोठ्या अधिकारी पदावर गेला असता.

धोनीचा जन्म (1981) ते त्यानी भारताला मिळवून दिलेला विश्‍वकरंडक हा संपूर्ण प्रवास निरजने अतिशय विस्ताराने या चित्रपटात मांडलाय. अर्थातच विस्ताराने मांडला असल्याचे त्याची लांबी वाढली असून चित्रपट तब्बल 3 तास 10 मिनिटांचा बनला आहे. या संपूर्ण प्रवासात धोनीला विविध टप्प्यावर भेटत गेलेल्या व्यक्तिरेखा अतिशय खुबीने यामध्ये पेरण्यात आल्या आहेत. त्यामध्ये त्याचे शाळेतले क्रिकेटचे कोच, चार जिवलग मित्रांची फौज, आई-वडील आणि बहिण तसेच साक्षीशी लग्न करण्याआधी धोनीच्या आयुष्यात आलेली त्याची प्रेयसी व साक्षी या प्रमुख पात्रांचा समावेश आहे.

आज संपूर्ण क्रिकेट जगतात प्रसिद्ध असलेला ‘हेलिकोप्टर’ शॉट धोनीला कोणी शिकवला, धोनीकडे प्रचंड क्षमता असूनही ‘अंडर-19’संघामध्ये युवराज सिंग, महंमद कैफ, दिनेश कार्तिक यांच्यासोबत त्याची निवड का झाली नाही, त्याच्याच वयाचे युवराज-महंमद लॉडर्सवर 2002मध्ये इंग्लड विरूद्धचा सामना गाजवत असताना धोनी रेल्वेत टीसीचा जॉब का करीत होता, अखेरीस वयाच्या 23 व्या वर्षी धोनीला भारतीय संघात कशी संधी मिळते, प्रियांका त्याला कुठे भेटते व तिचं पुढे काय होतं आणि नंतर तो साक्षीशी लग्न का करतो या घटनांचा उलगडा या चित्रपटातून करण्यात आला आहे. पूर्वार्धातील धोनीची कहाणी अत्यंत प्रेरणादायी वाटते परंतु उत्तरार्ध मनोरंजनाच्या दृष्टीने जरा फुलवला गेला आहे, असं मला वाटतं. रोमांच, इमोशन्स, रोमान्स आणि मनोरंजन या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर अंतर्भात चित्रपटात आहे.

सुशांत सिंगच्या करिअरमधली ही माईलस्टोन भूमिका आहे, असे म्हटल्यास अधिकचे होणार नाही. शक्यतो बायोपिकमध्ये नावजलेल्या कलाकारांना घेतले जाते, जेणेकरून चित्रपट चालावा. उदाहरणार्थ ‘भाग मिल्खा भाग’ मध्ये फरहानला तर ‘मेरी कोम’मध्ये प्रियांकाला घेतले होते. पण या चित्रपटांच्या तुलनेत विचार केला तर महेंद्र सिंग धोनी हा स्वत: मास फिगर असल्याने मोठ्या स्टारची त्यासाठी गरज नव्हती. तरीदेखील सुशांत सिंगने अतिशय खुबीने ही भूमिका साकारली आहे. धोनीची बोलण्याची, चालण्याची पद्धत, मैदानावर वावरण्याची स्टाईल, त्याचा लूक सगळच सुशांतच्या अभिनयातून जुळून आलयं. चित्रपट जसा जसा पुढे सरकत जातो तसं तसं सुशांतसिंगच धोनी असल्याचा भास आपल्याला होतो आणि हेच त्याच्या अभिनयाचं खर यश आहे असं म्हणावं लागेल. सुशांतबरोबरच अनुपम खेर, राजेश मिश्रा, कुमुद शर्मा, भुमिका चावला, कायरा अडवानी, दिशा पटानी यांनीही आपल्या व्यक्तीरेखांना योग्य न्याय दिलाय. प्रत्येक पात्राच्या सशक्त अभिनयाने हा चित्रपट आणखीनच दर्जेदार बनलाय. विश्‍वकरंड जिंकल्यावर अनुमप खेर आणि राजेश मिश्राने केवळ चेहर्‍यावरील हावभावाच्या सहाय्याने केलेला अभिनय लाजवाब!

या चित्रपटासाठी निरजने कथा, पटकथा व संवाद लेखक तसेच दिग्दर्शकाची चौपदरी भूमिका साकारली आहे. कथा व पटकथा लिखाणात त्याला दिलीप झा यांनी सहाय्य केले आहे. ‘धोनी कोई तेंडूलकर है? नही पाजी धोनी धोनी है!’, ‘ये इतमेसे ही खुश होने वालो में से नही है!’ यासांरखे काही संवाद प्रभाव पाडतात. विशेष कौतुक करावसं वाटतं ते या चित्रपटातील ‘व्हिज्युअल इफेक्टस’चं. क्रिकेट सामन्यांच्या सीन्स्मध्ये धोनीच्या चेहर्‍यावर सुशांतचा चेहरा लावून ते सीन्स् दाखविण्यात आले आहेत. शाळेतला सुरूवातीचा सुशांतचा चेहरा लावलेला सीन सोडला तर बाकी सर्व सीन्स एकदम परफेक्ट जमले आहेत. तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर याठिकाणी कला दिग्दर्शकाने केल्याचे दिसून येते. कथेच्या ओघाने येणारी गाणी थोडी लाऊड असली तरी ठिक आहेत.

राहून राहून काही गोष्टी खटकतात त्या म्हणजे, धोनी आज जगातील एक सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे; पण तरीही यासंदर्भाने एकही सीन यामध्ये दाखविण्यात आला नाही. मैदानावर जो काही धोनी दाखवलाय तो चौकार आणि षटकारच मारताना. शाळेत असताना धोनीला बॅनर्जी सर क्रिकेटच प्रशिक्षण देतात पण त्यापुढे धोनी प्रशिक्षकाविनाच इथपर्यंतचा प्रवास यशस्वी करतो, हे जरा अती वाटतं! आंतरशालेय क्रिकेट स्पर्धांमध्ये कॉमेंट्री करणारेच दोघ जण देवधर ट्रॉफीसारख्या मोठ्या सामन्यातही कॉमेंट्री करताना दिसतात म्हणजे नवलच...याव्यतिरीक्त धोनीचे आपल्या सहकार्‍यांशी संबंध कसे होते, तो थेट भारतीय टीमचा कप्तान कसा झाला आणि अत्यंत तणावाच्या वातावरणातही धोनी कूल कसा राहतो या प्रश्‍नांची उत्तर तुम्हाला अपेक्षित असतील तर ही उत्तरही हा चित्रपट देत नाही. तसेच यामध्ये ‘कॉन्ट्राव्हर्सी’तर अजिबातच नाहीये. आजपर्यंत धोनीने ज्यापद्धतीने आपली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न केलाय तोच प्रयत्न या चित्रपटातूनही केल्याचे जाणवते. एवढच काय तर काही अनावश्यक सीन्स् केवळ धोनीच्या आग्रहाखातरच घेतले असावेत असा माझा अंदाज आहे.

महेंद्रसिंग धोनीचे चाहते हा चित्रपट दोन-तीन वेळा तरी नक्कीच बघतिल. फक्त क्रिकेटचे चाहते असणारे हा चित्रपट एक-दोनदा तरी बघतीलच आणि क्रिकेटचा गंधही नसलेल्यांनी मनोरंजन म्हणून एकदा हा चित्रपट बघण्यास हरकत नाही (तीन तास दहा मिनीटांचा वेळ काढून).