खाद्यभ्रमंती- ड्राय फ्रुट कुल्फी

    27-Oct-2016
Total Views |

नमस्कार मैत्रांनो ,

 
मस्त खाणपिणे आणि झक्कास जगणे हा समाधानी आयुष्याचा भक्कम पाया आहे असे देशविदेशांतील जगप्रसिद्ध शेफ सांगतात. 
 
विशेषतः युरोपियन देशांतली लाईफ स्टाईल जर आपण नीट अभ्यासली तर छान छान वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ करणे, मित्र-मैत्रिणीसोबत त्यांचा आनंदाने आस्वाद घेणे आणि जगण्याचा मनमुराद आनंद सिप-सिप करत उपभोगणे असा त्यांचा दिनक्रम आढळतो.
 
मनात आलं आपण सुद्धा असं छान आयुष्य, समाधानी आयुष्य, स्वदिष्ट्य आयुष्य, साग्रसंगीत आयुष्य अन रंगीन आयुष्य का जगू नये? 
 
मी तसा लहानपणापासूनच किचन मध्ये लुडबुड करणारा प्राणी. लहानपणी आईने आणि आता लग्नानंतर किचन मध्ये माझी लुडबुड करण्याचे स्वातंत्र्य गार्गीने, माझ्या बायकोने अबाधित ठेवले. आणि किचन झाले माझे दुसरे आनंदाचे ठिकाण, पहिले म्हणजे छायाचित्र टिपणे. 
 
चला तर मग आजपासून आपण भेटूया दर आठवड्याला वेगवेगळ्या टेस्टी रेसिपिंसोबत, आणि आयुष्याचा मनमुराद आनंद देत आणि घेत....चाखतं 
 
आज सुरुवात करुया एका भन्नाट आणि बालगोपालांना आवडणाऱ्या डिश सोबत....
 
आईस्क्रीम आणि कुल्फी वगैरे वगैरे ही स्पेसिफिक जातकुळी अशी आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो की यांच्यावर ताव मारायला कुठलाही सिझन सगळ्यांनाच चालतो...

माझ्या सदाशिव पेठेतल्या घराला भली मोठी टेरेस आहे...

ही मी केलेली भन्नाट कुल्फी मी बऱ्याचदा माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत , आप्त-स्वकीयान्सोबत या टेरेस शेजारच्या शेड मध्ये बसून बाहेर पाऊस धो धो कोसळताना चापलेली आहे...

तुम्ही सुद्धा हा अपरिमित आनंद उपभोगावा म्हणून मी केलेल्या ड्राय फ्रुट कुल्फीची रेसिपी खाली देत आहे..

इच्छुकांनी नक्की ही कुल्फी करून पहावी, 
 
मला जमली म्हणजे सर्वांनाच छान जमेल हे नक्की...
 
शुभेच्छा ........
 
 
 
ड्राय फ्रूट कुल्फी
 
साहित्य
 
४ कप म्हशीचे दुध (अर्धा लिटर दुध म्हणजे साधारण तीन कप होतात) 
 
१ कप साखर (ज्या कपातून दुध मोजणार त्याच कपातून त्याच मापाने साखर मोजा)
 
६ वेलदोड्यांची पावडर, 
 
२५ कच्चे पिस्ते (खारवलेले नाही), 
 
१० बदाम , 
 
चिमुटभर केशर, 
 
२ स्लाईस पांढरा ब्रेड (व्हीट ब्रेड अजिबात नको...किंचित वापरतो आपण इथे हा नेहेमीचा मैद्याचा साधा व्हाईट ब्रेड...त्यामुळे हाच मैद्याचा साधा व्हाईट ब्रेड वापरावा), 
 
१ मध्यम चमचा कॉर्न फ्लॉअर .

पाककृती 

१) -प्रथम २ पांढरया ब्रेडच्या स्लाईसच्या जाड कडा कापून काढून टाकून द्या. 
-नंतर या दोन्ही ब्रेडचे छोटे तुकडे करून मिक्सरच्या मोठ्या भांड्यात टाका. 
-यामध्येच मक्याचे १ मध्यम चमचा पीठ घाला.
-आता १ कप म्हशीचे दुध घालणे आणि थोडा वेळ फिरवून याची नीट पेस्ट करून बाजूला करून ठेवा.

२) एका नेवेद्याच्या लहानश्या वाटीत २\३ चमचे गरम दुध घ्या आणि यात केशर नीट हलवून, विरघळवून केशर-दुध मिश्रण तयार करून ठेवा.

३) -उरलेले तीन कप दुध आता जाड बुडाच्या अथवा नॉन स्टिक पॅनमध्ये घेऊन उकळायला ठेवा.
-सतत हलवत राहणे अन्यथा थोडेजरी दूध खाली लागले तरी पूर्ण कुल्फीला जळक्या दुधाचा वास आणि चव राहील.
-या दुधाला एक उकळी आली म्हणजे साधारण ५/७ मिनिटांनंतर मगासची आपण करून बाजूला ठेवलेली पेस्ट यामध्ये घाला आणि पुन्हा एकदा सतत हलवत राहा.
-आता जास्त काळजीपूर्वक आणि सतत हलवा कारण आता मक्याचे पीठ खाली चिकटून लागू शकते आणि कुल्फी बिघडू शकते. 
-साधारण पूर्ण चार कप दुधाचे उकळून निम्मे म्हणजे दोन कप दुध झाले की त्यात एक कप साखर घाला. साखर विरघळवून नंतर आता यामध्ये पिस्ते आणि बदाम बारीक तुकडे करून घालावेत. वेलदोड्याची पूड घाला आणि विस्तव बंद करा. 

४) विस्तव बंद केल्यावर मगासचे केशर - दुधाचे तयार केलेलं मिश्रण यात नीट एकजीव करा आणि हे संपूर्ण मिश्रण आता काचेच्या बाउलमध्ये ओतून घ्या आणि बाहेरच थंड करत ठेवा.

५) मिश्रण थंड झाल्यावर एक फूड ग्रेडचा, बाउल पूर्णपणे आणि नीट झाकला जावू शकेल असा, प्लास्टिक पेपर (चौकोनी तुकडा) घ्यावा.
हा प्लास्टिक पेपर, ज्या काचेच्या बाउलमध्ये मिश्रण घेतले आहे, त्या काचेच्या बाउलमध्ये अश्या प्रकारे वरून अलगद दाबून बसवावा की आत जाऊन हा आतील मिश्रणाला वरच्यावर अलगद सर्व बाजूंना चिकटेल आणि या प्लास्टिक पेपरची उरलेली आतील बाजू काचेच्या बाउलला आतून चिकटून राहील. 
 
(ही कृती नीट आणि काळजीपूर्वक करावी म्हणजे कुल्फी मध्ये बर्फ तयार होणार नाही)



असे केल्यानंतर लगेच हा बाउल फ्रीजर मध्ये ठेवावा आणि ७-८ तासानंतर बाहेर काढावा.

६) बाउल पेक्षा मोठे भांडे गरम पाणी घ्यावे आणि त्यात हा बाउल वरच्यावर बुडवावा. यामुळे आतील कुल्फी अलगद मोकळी होऊन डिझायनर प्लेट वर अलगद काढून घेता येईल.

चला तर मग...झटपट रेसिपी आहे...मुलांच्या शाळांना नुकत्याच सुट्ट्या सुरू झाल्यात आणि ही नवीन रेसिपी ट्राय करण्यासाठी दिवाळीचा शुभ मुहुर्त आहेच ...तेव्हा मुलांना ही अत्यंत सोप्पी आणि पौष्टिक ड्राय-फ्रुट कुल्फी करून द्या...

आणि तुम्ही दिवाळीच्या फराळासोबत या होम मेड भन्नाट कुल्फीचा आस्वाद घ्या....

 रेसिपी कशी वाटली नक्की सांगा...

आणि  ही डिश केल्यानंतर नक्की कळवा....
 
भरपेट खा... आरोग्यदायी रहा.. खूष व्हा... मस्त जगा
 
 - मिलिंद वेर्लेकर