'स्वच्छ - सुंदर मुंबई'साठी स्‍वच्‍छता मोहीम सुरूच राहणार

महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांची ग्वाही

    27-Apr-2024
Total Views |

bmc


मुंबई, दि.२७ :
सार्वजनिक स्‍वच्‍छता हे महानगरपालिकेचे प्राथमिक कर्तव्‍य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. मुंबई स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरु असलेले सखोल स्वच्छता अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्‍हे तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्यासाठी महत्‍त्‍वाचे आहे. सखोल स्‍वच्‍छ मोहिमेला लोकचळवळीमध्ये रुपांतरित करण्यासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत. ही मोहीम यापुढे देखील सातत्याने व जोमाने सुरू राहील, अशी ग्‍वाही बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिली. स्‍वच्‍छता मोहीम राबविल्‍यानंतर तो परिसर कायम स्‍वच्‍छ व सुंदर ठेवण्‍याची जबाबदारी नागरिकांची देखील आहे, असे नमूद करुन मुंबईकर नागरिकांनी स्‍वच्‍छता मोहिमेत सहभागी व्‍हावे, असे आवाहन देखील आयुक्‍तनी केले.

मुंबई महानगरात गत २३ आठवड्यांपासून सखोल स्वच्छता मोहीम सुरू आहे. या मोहिमेला व्यापक स्वरुप देत दर शनिवारी प्रत्येक प्रशासकीय विभागात नियमितपणे स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये ही मोहीम निरंतर सुरू आहे. या अंतर्गत शनिवार,दि. २७ एप्रिल रोजी सर्व २५ प्रशासकीय विभागात (वॉर्ड) लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी सकाळी ७.३० वाजेपासून केलेल्या दौ-यात स्वच्छतेच्या सर्व कार्यवाहीची पाहणी करतानाच स्वतः मोहिमेत प्रत्‍यक्ष सहभाग देखील घेतला. यावेळी अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांच्यासह संबंधित अधिकारी,कर्मचारी तसेच स्‍थानिक नागरिक उपस्थित होते.

मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही

मुंबईकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असे स्‍पष्‍ट करताना आयुक्‍त भूषण गगराणी म्‍हणाले की, जलपुरवठ्याची परिस्थिती सध्या पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे. गतवर्षी पाऊस कमी झाला होता. जो पाऊस झाला, तो कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाला होता. त्यामुळे पाणी साठा कमी झाला. भातसा, तानसा जलाशयांची पाणी पातळी खाली गेली आहे. ही वस्तुस्थिती असली तरी देखील मुंबईकरांना साधारणतः १५ जुलैपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. यंदा पावसाळा वेळेवर सुरु होवून समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज हवामान खात्‍याने वर्तविला आहे, याकडेही आयुक्‍त महोदयांनी प्रसारमाध्‍यम प्रतिनिधींचे लक्ष वेधले.