सोढी विमानतळावर आला, पण विमानात बसलाच नाही! ‘तारक मेहता फेम…’ अभिनेता बेपत्ता

    27-Apr-2024
Total Views |
अभिनेता गुरुचरण सिंग अर्थात सोढी अचानक बेपत्ता झाला असून दिल्ली पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
 

sodhi  
 
मुंबई : सर्वाधिक लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Gurucharan Singh) या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा अभिनेता गुरुचरण सिंग (Gurucharan Singh) बेपत्ता झाल्याचे धक्कादायक वृत्त समोर आले आहे. 'रोशन सिंग सोढी' ही भूमिका साकारणारा हा अभिनेता दिल्ली विमानतळावरुन २२ एप्रिल रोजी गायब झाला असून. त्याच्या वडिलांनी जवळच्या एका पोलीस स्टेशनमध्ये तो हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी आता दिग्दर्शक जेडी मजेथिया यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
 
दिग्दर्शक मथेजिया म्हणाले की, “मी एका मीटिंगमध्ये होतो, आणि तेव्हा माझ्या एका मैत्रीणीचा फोन आला. त्यावेळी तिने सांगितले की २२ एप्रिलपासून गुरुचरण बेपत्ता आहे. तो २२ एप्रिलला मुंबईत येणार होता. दिल्ली विमानतळावर येण्यासाठी तो घरातूनही बाहेर पडला होता, मात्र तो मुंबईत पोहोचलाच नाही. भक्ती त्याला आणण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती, पण तो कुठे सापडलाच नाही.'
 
ते पुढे म्हणाले की, ' एअरपोर्ट अधिकाऱ्यांशी याविषयी चौकशी केली असता असे समजले की गुरुचरण विमानात बसलेच नाही. मात्र विमानात चढण्यापूर्वी त्याने भक्तीला मेसेज केलेला की तो आता बोर्डिंग प्रक्रिया सुरू करत आहेत”. दरम्यान, सध्या गुरुचरणचे पालक त्याचा शोध घेत आहेत.
 
 
 
गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या तपासातून CCTV फुटेजही समोर आला आहे. याबद्दल दक्षिण पश्चिम दिल्लीचे डीसीपी रोहित मीना म्हणाले," गुरुचरण सिंग यांच्या कुटुंबाने तक्रार दाखल केली असून २२ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता ते मुंबईसाठी निघाल्याचं त्यांनी नमूद केलं. आम्ही केस रजिस्टर केली असून या प्रकरणाचा तपास केला आहे. आम्ही फुटेज आणि टेक्निकल तपास केला. त्यातून काही महत्वाच्या बाबी हाती लागल्या आहेत. कलम ३६५ अंतर्गत केस दाखल केली आहे. प्राथमिक चौकशीतून गुरुचरण यांची हालचाल CCTV मधून पाहिली आणि यातून पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न केले. सोबत एक बॅगपॅक घेऊन ते जाताना दिसले."