राऊत खोटं का बोलतायं? प्रकाश आंबेडकरांनी झापलं!

    28-Mar-2024
Total Views |

Prakash Ambedkar


 प्रकाश आंबेडकर यांनी फोटो ट्विट करत राऊतांवर टीका केली आहे. 

मुंबई : महाविकास आघाडीला सुरुंग लागल्यानंतर आता प्रकाश आंबेडकरांनी पहिल्यांदाच मविआतील अंतर्गत गटबाजीवर बोट ठेवले आहे. वंचित बहुजन आघाडीला मविआत घ्यावं यासाठी उद्धव ठाकरेंनी शर्थीचे प्रयत्न केले. त्यासाठी शरद पवार यांचीही मनधरणी केली मात्र, संजय राऊतांमुळेच मविआतून वंचित आघाडी बाहेर पडली असल्याचा गौप्यस्फोट खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकरांविरोधात काँग्रेसने उमेदवार द्यावा यासाठी संजय राऊत प्रयत्नच करत होते, असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी 'एक्स पोस्ट' करत ही माहिती दिली आहे. "संजय राऊत आणखी किती खोटं बोलणार आहात?", असा सवालच त्यांनी विचारला आहे. जर आम्ही आणि इतर पक्ष एकत्र आहोत तर आम्हाला बैठकीला का बोलावत नाही. परस्पर बैठका का घेता?, असा प्रश्न त्यांनी केला आहे. यापूर्वी ६ मार्च रोजी झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं याची पोलखोलच आंबेडकर यांनी केली आहे. "६ मार्च रोजी फोर सीजन्स हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत आमच्या कुठल्याही प्रतिनिधीला का निमंत्रित केले नाही. तुम्ही वंचितला वगळून बैठका का करत आहात? जर तुम्ही आम्हाला मित्र पक्ष म्हणवत असाल तर पाठीत सुरू खुपसण्याचं काम का करता?", अशा कडक शब्दांत राऊतांचा समाचार घेतला.

सिल्वर ओकच्या बैठकीत नेमकं काय घडलं हे आम्हाला चांगलचं माहिती आहे. तुम्ही आमच्याबद्दल या बैठकीत काय भूमिका घेतली हे ही आम्हाला कळलं आहे. आमच्या विरुद्ध आकोल्यात उमेदवार उभा करण्याचा आहे हे स्पष्टपणे तुम्ही बैठकीत बोललात की नाही, हे खरं नाहीये का? ही कसली मैत्री आहे? एकीकडे आघाडी करण्यासाठी प्रयत्न करता दुसरीकडे आम्हाला पाडण्यासाठी षडयंत्र करता? हेच का तुमचे विचार आहेत?, अशा शब्दांत त्यांनी राऊतांवर आगपखड केली आहे.

राऊतांनी दोन दिवसांत दोनदा भूमिका बदलली!

उद्धव ठाकरेंनी कायम संयमाची भूमिका घेत प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी पवारांनाही गळ घातली. काँग्रेसही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्याची मागणी करू लागली होती. मात्र, संजय राऊतांच्या या वक्तव्यांमुळे आणि सतत बदलणाऱ्या भूमिकांमुळे आंबेडकरांनी एकला चलोरेची भूमिका निवडली. संजय राऊतांनी दोन दिवसांत दोन वक्तव्ये दिली होती. "प्रकाश आंबेडकरांशिवाय आम्ही जिंकू," असं वक्तव्यं करणारे राऊत दुसऱ्या दिवशी प्रकाश आंबेडकरांसोबत आमची चर्चा सुरू आहे, असं विधान दुसऱ्याच दिवशी केलं होतं. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषद घेत वंचित मविआसोबत जाणार नसल्याचे म्हणूत उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती.