होळीला बोंब का ठोकतात?

    25-Mar-2024
Total Views |

holika dahan 
 
आपण बरेचदा पाहतो, होळीच्या दिवशी आणि त्यानंतर धुळवडीच्या दिवशी शहरापासून दूर गावातले लोक एकमेकांना सर्रास शिव्या देतात. एरवी असांस्कृतपणा म्हणून अरे ला कारे केले असते असे अर्वाच्च शब्द लोक होळीच्या दिवशी ऐकून का घेत असतील? तर त्यामागे एक खूप लांब गोष्ट आहे. लांब म्हणजे मोठी नाही, पण काळ गेला तशी बदलत गेलेली. फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला पूर्वा फाल्गुनी नक्षत्र येते. त्या नक्षत्राची देवता ‘भग’ ही आहे. तेव्हा भगाच्या नावाने बोंब ठोकायची, ही एकप्रकारची पूजाच होय. तो त्या देवतेचा सन्मानच समजावा. बोंब म्हणजे पालथी मूठ ओठांसमोर घेऊन ओरड करायची. या भगाचा अपभ्रंश पुढे पुढे भट असा झाला आणि ब्राह्मणेतर समाजात भटाच्या नावाने बोंब ठोकणे असे रूढ होऊन गेले. त्याला जोडून अनेक ठिकाणी यमक जुळवले गेले आणि होळीची पारंपरिक अर्वाच्य गाणी तयार झाली. बरं का, याला काही ठिकाणी हुताशनी असेही म्हंटले जाते. हुताशनी निनादाचे स्थुलातून प्रकटीकरणाचे प्रतीक म्हणून सध्याच्या काळातही होळीच्या भोवती मोठ्या घोळक्याने एकत्रित धावत बोंबाबोंब केली जाते. आता हुताशनी म्हणजे काय, तर बघा उंचावरून प्रचंड वेगाने हेलकाव्यांसहित खाली खाली येतांना आपोआपच बाहेर पडलेल्या किंकाळीला ‘हुताश्ना’ असे म्हणतात, म्हणजे गोल फिरणार्याज झोपाळ्यात उंचावर गेल्यानंतर वेगाने खाली येतांना पोटात कलकल होते, म्हणजेच पोटातील वायू-पोकळीत काही ठिकाणी दाब निर्माण होतो आणि त्यामुळे काही ठिकाणी पोकळ्या निर्माण होतात. निर्माण झालेल्या पोकळ्या भरून निघतांना पोटातील वायूपोकळीतील प्रचंड वेगाने होणार्याो वायूच्या हालचालींमुळे आपल्याही पोटात सूक्ष्म निनाद निर्माण होतो. या नादाला शब्द नसल्याने त्याला ‘सूक्ष्म हुताश्नच’ म्हणतात. सूक्ष्म हुताश्न स्थुलातून किंचाळण्याच्या माध्यमातून बाहेर पडतो. तो व्यक्त करण्याची ही पद्धत.
 
या बोंब मारण्याचा प्रघात पुढे पुढे शिव्यांवर गेला. कोकणात आणि महाराष्ट्राच्या इतरही भागात शिव्या हा अनेक बोली भाषांमध्ये सर्रास वापरल्या जातात. त्यामुळे बोंब मारताना त्याही सोबतीने येतात त्यात काही नवल नाही. गावागावात शेत बागांच्या सीमेवरून भावंडभावंडात अनेक वाद असतात, या शिव्या त्यांच्या नावाने सर्रास जाहीर दिल्याने मनातील कटुताही कमी होते आणि सर्व काही जाहीर होत असल्याने अनेक प्रश्न सुटतात. या सणाच्या निमित्ताने उद्दीप्त केलेल्या अगणित सर्व वाईट ते जाळून जावे आणि सोन्यासारखी नाती उजळून निखरून यावीत असा उद्देशही या प्रथेमागे असावा. होळीच्या रात्री छान चांदणे पडलेले असते, स्त्रिया धुनीभोवतीने फेर धरून नाचतात तर दुसऱ्या दिवशी धुळवडीला तीच राख एकमेकांच्या चेहऱ्याला फासून मुलं धुळवड खेळतात. ही रंगपंचमी नाही. रंगपंचमी पुढे ४ दिवसांनी पंचमीच्या दिवशी येते. होळी, धुळवड आणि रंगपंचमी या तीन वेगवेगळ्या सणांचे एकत्रीकरण हल्ली बरेचदा शहरांतून पाहायला मिळते, बदलत्या काळाचा आणि कमी पडणाऱ्या वेळेचा हा परिणाम असावा की चीत्रपटांमुळे असे होत असावे? तुम्हाला काय वाटते कमेंटबॉक्स मध्ये कळवा..