गौतमी माहात्म्य म्हणजे काय?

    21-Mar-2024
Total Views |

gautami mhatmya 
 
मुंबई : महाराष्ट्र राज्य, साहित्य संस्कृती मंडळाने एक ग्रंथ प्रकाशित केला आहे. ३ खंडातील या ग्रंथाचे संपूर्ण नाव 'गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा सांस्कृतिक अभ्यास' असे आहे. पुरातत्व शास्त्र अभ्यासक आणि इतिहास व संस्कृती अभ्यासक डॉ. अरुणचंद्र पथक यांनी या ग्रंथाचे संपादन केले आहे. गौतमी म्हणजे गोदावरी. या नदीच्या तीराने तिच्या खोऱ्यात संस्कृती कशी बदलत गेली याचे सविस्तर वर्णन या ग्रंथात आले आहे. दै. मुंबई तरुण भारताला दिलेल्या मुलाखतीत आपल्या ग्रंथाविषयी ते सांगत होते.
 
ते म्हणाले, "गोदाखोरे एक स्वयंपूर्ण परिसंस्था आहे, या दक्षिण द्वीपकल्पीय, पश्चिम घाटोद्भव आणि पूर्ववाहिनी नदीला वृद्धगंगा व दक्षिणगंगा म्हणून ओळखतात. मध्य भारताला दक्षिण भारताशी जोडणारी अशी गोदावरीच्या खोऱ्याची ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्र, तेलंगणा व आंध्र प्रदेशातून प्रवाहित होणाऱ्या गोदावरी नदीचे खोरे मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा व कर्नाटकच्या सीमांना स्पर्श करते. प्रामुख्याने मान्सूनचे अपत्य असलेली गोदावरी नदी मान्सूननंतर काही काळाने खंडित होते. प्रवाहात तिला प्रवरा, ढोरा, सिंदफणा, सरस्वती, मांजरा या व इतर एकूण ३३ उपनद्या मिळतात. तर तिच्या डाव्या बाजूकडून अगस्ती, शिवभद्रा, येलभद्रा, पूर्णा, प्राणहिता, इंद्रावती अशा एकूण ३५ उपनद्या मिळतात, गौतमी माहात्म्य व तिच्या अष्टांग स्थानांचा संस्कृतिक अभ्यास या बृहत् प्रकल्पात गोदावरी नदीच्या खोऱ्याचा अभ्यास करताना तो तिच्या विविध अंगांनी केला आहे. या पुस्तकातत गोदावरीचे भौगोलिक व भूशास्त्रीय दृष्टीकोनातून तपशील दिले आहेत. शिवाय तिच्या भूपुरातत्वीय स्वरूपातील प्राचीन पर्यावरणाचा तपशील नोंदवला आहे."