संगीत ते समाधी (भाग-२९)

    20-Mar-2024
Total Views |
sangeet and Samadhi part - 29

ग्राम षड्ज

गंधारग्रामातील षड्ज आजच्या षड्ज ग्रामातील मध्यमावर तर प्राचीन संगीतातील मध्यमाच्या प्रथम श्रुतीवर येतो. असला मध्यगत स्वर षड्ज कल्पून त्यावर गंधारग्रामाच्या इतर स्वरांची त्या श्रुतीयोग्य इमारत उभारायची, हे सारेच किती कठीण वाटण्यासारखे आहे. पण, प्राचीन परंपरेत आजच्याप्रमाणे एकच गायक बहुरुप्या बनत नसल्याने, गंधर्व ग्रामानुसार गायन करणार्‍यांच्या स्वतंत्र परंपराच असत. असल्या गंधार ग्रामाच्या गायकांना इतर ग्रामाच्या स्वरांचा स्पर्शसुद्धा होऊ देत नसत. तेव्हाच त्यांना ‘गंधर्व’ म्हटले जाईल. गंधार ग्रामातील गंधार, ऋषभ, धैवत आणि मध्यमही प्रत्येकी तीन श्रुतीचे असत. पंचम-षड्ज मात्र चार श्रुतींचे असत. असले कमी अधिक श्रुतींचे गायन आम्हाला भयंकर कठीण वाटले, तरी गंधर्वाच्या परंपरेच्या कंठाची उड्डाण त्याच स्वरावर सहजगत्या होत असल्याने त्यांना ते गंधारग्राम गायन अगदी सहज असे.

उलट आमचे आजचे गायनच त्यांना गाता यायचे नाही. जसे संस्कार तसे ग्राम आणि जसे ग्राम तसे सहजस्फूर्त गायन, असा हा सहज प्रकार आहे. मध्यमग्रामाचा षड्ज मात्र प्राचीन मध्यमावर होता. म्हणून मार्गी संगीत गायला स्वरांचे दृष्टीने त्यावेळच्या गायकांना कठीण वाटत नसावे. परंतु, मध्यम ग्रामातील गंधार चार श्रुतींचा असून मध्यम मात्र दोनच श्रुतींचा असे. आजच्या गायकाला चार श्रुतींचा गंधार सोडल्यास अभ्यासाने मध्यमग्राम गायला तितके अवघड वाटू नये. पण, त्याकरिताही तसल्याच परंपरेने गायन करण्याची आवश्यकता आहे. प्राचीन संगीताच्या या परंपरा आज लुप्तप्राय झाल्यासारख्या आहेत. त्या कोठे असतील हे सांगणे कठीण आहे. प्रयत्न केल्याने आणि गानयोगातील साधनेद्वारे स्वर निश्चिती केल्यास त्या साध्य होऊ शकतील असे वाटते. प्राचीन षड्जग्राम, आजचा षड्जग्राम आणि त्यावर आधारित गंधार आणि मध्यमग्राम यांच्या आराखड्यावर दृष्टिक्षेप केल्यास असे दिसून येईल की, प्राचीन षड्जग्राम गाणेच आज आम्हाला कठीण जाईल. मग त्या षड्ज ग्रामावर आधारित इतर ग्राम गाण्याची गोष्ट तर आणखी दुष्कर होईल. असे ग्रामनिहाय संगीत गाण्याकरिता त्या-त्या ग्रामाचे गायक, गाण्याच्या परंपरा निर्माण व्हायला हव्यात. पूर्वी त्या तशा उत्पन्न केल्या जात.

ग्रामनिहायक स्वतंत्र संस्काराचे गानयोगी तयार केल्यासच हे सर्व शक्य आहे, आजचा गायक एकाच बैठकीत धृपद धमार, ख्याल, ठुमरी, टप्पा, कजरी, गजल इत्यादी सर्व गीत पद्धतीतील प्रकार मोठ्या लीलया म्हणण्याचा आव आणतो आणि असा जो प्रयत्न करेल, त्याला श्रोत्यांकडून वाहवासुद्धा मिळते. वरील गायनपद्धतीच मुळी एक दुसर्‍यापेक्षा भिन्न आहेत. उत्तम तर्‍हेने ठुमरी म्हणणारा उत्तम तर्‍हेने ख्यालगायन करू शकत नाही. तसा प्रयत्न केल्यास परस्पर पद्धतीचा परस्पर पद्धतीवर परिणाम होऊन अंती त्याचे गायन कोणत्याच पद्धतीचे राहत नाही. वरील सर्व गीतपद्धतीत स्वरश्रुतीसारख्याच असताना हा घोटाळा होतो, मग ज्या गायनपद्धतीत स्वर श्रुतीचाच मूलतः भेद असेल तसले गायन स्वतंत्र परंपरा असल्याशिवाय कसे उत्पन्न होणार? मध्यकालातील गायन धृपद धमाराचे जरी असले तरी त्यातही गौरहारी, नौहारी, डागरी आणि खंडारी अशा चार रीती असत. त्या कशा असत याचीही आम्हाला आज कल्पना नाही, त्यावर आज ज्याला जे वाटेल तो ते सांगतो. धृपद-धमार मागे पडून ख्यालगायन सुरू झाले. ख्याल गायनाला आता ठुमरी, गजल आणि नाट्यगीते मागे पाडायला पाहत आहेत. आजचे ख्यालगायन नाममात्र राहिले आहे.

धृपद-धमाराबद्दल बोलायची सोयच नाही, विस्मरण म्हणजे विकसन असे समीकरण होऊ पाहत आहे. बरे, विस्मरण कशाचे? चांगल्या की वांगल्याचे हादेखील एक चिंतनीय प्रश्न आहे. रंजकता हीच विकसनाची कसोटी धरल्यास मानवी मनाच्या रंजकतेच्या कल्पना सदा बदलत असतात. त्या इतक्या बदलत असतात की एकेकाळी त्याज्य समजल्या गेलेल्या गोष्टींना आज पुन्हा महत्त्व येत आहे, एकेवेळी गालावर लांब कल्ले ठेवणे आणि हजामत वाढविणे हे रानटीपणाचे लक्षण समजले जाई, तर आज त्यालाच अतिशय रसिकता प्राप्त झाली आहे. जितके गचाळ व गबाळ राहता येईल तेवढी आजची शान झाली आहे. संगीताचेही असेच होत आहे. आजची सिनेसंगीते जुन्या साध्या, सरळ आणि खटकेदार गायन पद्धतीवर येऊ घातली आहेत, हे सिनेसंगीताकडे बारीक दृष्टीने लक्ष्य देणार्‍यांच्या ध्यानात आल्याशिवाय राहणार नाही. एकूणच काय तर विकास किंवा रंजकता कितीही प्रगतीशील आणि पुढील वाटली तरी सर्व गती वर्तुळाकार असल्याने कालच्या आवडी-निवडी आणि रंजकतेच्या कल्पना आज जरी त्याज्य वाटल्या तरी उद्या त्या तशाच असतील, असे म्हणता येणार नाही. मग असल्या तथाकथित चक्रमेनिक्रमाच्या प्रवाहात गटांगळ्या खात वाहून जाण्यापेक्षा जे जे योग्य, शास्त्रीय आणि मानवाच्या कल्याणाला पोषक असेल त्याचे बुद्धी प्रयत्नाने जतन का करू नये? हा विचारवंतांनी विचार करण्यासारखा प्रश्न आहे.

स्वरांचे सामर्थ्य


प्राचीन संगीत परंपरेतील तपस्या आणि संस्कार यांचा समन्वय झाल्यास त्या परंपरेतील गायन शास्त्रीयदृष्ट्या विधायक बनू शकते, ही कल्पना थोडा वेळ बाजूला सारली, तरी स्वरांचेही एक स्वतंत्र सामर्थ्य आहे, हा सर्वांचाच अनुभव आहे. याबद्दल ’गंध, गंधार, गंधर्व’ या सदरात थोडी चर्चा आली आहे. तिचाच अधिक सोयीस्कर विचार केल्यास स्वरांचे आजही जे सामर्थ्य आहे, त्याचा प्रत्यय प्रत्येकालाच येईल, मग ऐकणार्‍याला ते गायन आवडो वा न आवडो. तीव्र स्वरात चेतना उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असते, तर कोमल स्वरात भावना कोमल करण्याची माया असते. कोमल स्वरांचा भरणा करून माणसाला चेतवता येणार नाही, तर उलट त्याच्या भावना आणि चित्त कोमल बनता बनता शांत होत जातील. गीत पौर्वात्य असो की पाश्चात्य पद्धतीचे असो, त्यातील तीव्र कोमल स्वरांचा जो व्हायचा तसाच परिणाम होईल. गाण्याच्या पदातील शब्दरचना कितीही आवेशयुक्त असली तरी त्यातील स्वर कोमल भावनांना प्राधान्य देणारे असतील, तर वर्ण्य शब्दांचा श्रोत्यांचे मनावर स्वरचनेनुसारच परिणाम होईल. धृपदधमारादी गीतात याचे अवधान ठेवले जात असे, पण नंतरच्या काळात मात्र हे अवधान सुटत गेले. मराठी लावण्यांमधील पदे श्रृंगाराची पण स्वरयोजना कलिंगडा, परज, पूर्वी इत्यादी करून रसोत्पाद स्वरांनी केलेली असल्याने श्रोत्यांच्या मनावर त्याचा व्हावा तसा योग्य परिणाम होत नाही. सिनेसंगीतात गाण्याला नवीन चाली देण्याच्या भरात असाच प्रकार घडतो. चित्ताला कल्याणप्रद भव्य-दिव्य भावना देण्याचे कार्य कल्याण थाट करतो.


-योगिराज हरकरे

(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)